Festivals रास्ता पेठेतील श्रीयाळशेठ राजाचा उत्सव

रास्ता पेठेतील श्रीयाळशेठ राजाचा उत्सव

तसं तर श्रीयाळ शेठ राजाची पूजा छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होते … पण इथे पुण्यातल्या रास्ता पेठेतील शिराळ चौकातील श्रीयाळ शेठ राजा उत्सवाविषयी बोलणार आहोत. या चौकाचे नावच मुळी श्रीयाळशेठ यांच्या नावावरून (नावाचा अपभ्रंश) पडले आहे.

खरं तर हा उत्सव बकरे यांच्या कुटुंबाचा … त्यांची सहावी पिढी तन-मन-धनाने हा उत्सव साजरा करत आहे. आजूबाजूचा समाज, व्यापारी यांचाही या उत्सवात उत्स्फुर्त सहभाग असतो… इथे कुणाला निमंत्रण द्यावे लागत नाही… विशेषतः व्यापारी वर्गाची खूप श्रद्धा आहे श्रीयाळशेठजींवर. या चौकाला या दिवशी अगदी जत्रा-यात्रेचे स्वरूप आलेले असते. नागपंचमीला दगडी नागोबाची पूजा आणि तिथल्या परिसरात जत्रेनंतर रस्त्यावरचे विक्रेते दुसरे दिवशी शिराळ चौक परिसरात येतात.

बकरे परिवार अत्यंत श्रद्धाळू, सौम्य स्वभावाचा. या उत्सवामुळे ते समाजाशी अजुनच घट्ट बांधले गेले आहेत. त्यांचा हा उत्सव सगळ्यांना आपला वाटतो. श्रीयाळ शेठ यांचा हा पारंपरिक मुखवटा एरव्ही त्यांच्या देवघरात पुजलेला असतो. श्रीयाळषष्ठी उत्सवानिमित्त तो बाहेर काढतात. दरवर्षी प्रसिद्ध मूर्तीकार श्री विवेक खटावकर त्याची रंगरंगोटी करतात. मग दिमाखात श्रावण शुद्ध षष्ठीला त्याची वाजत गाजत श्रद्धेने दुपारी १२.३० च्या सुमारास शिराळ चौकात प्राणप्रतिष्ठा करतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. दरवर्षी साधारण ४० हजारच्या आसपास भाविक इथे एका दिवसात हजेरी लावतात, असे श्री विकास बकरे यांनी सांगितले. “श्रीयाळशेठ वाणीया, खोबऱ्याच्या गोणीया,” असा घोष होतो. श्रीयाळ शेठ नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दिवसभराच्या उत्सवानंतर पूजा उतरवून मुखवटा पुन्हा बकरे यांच्या देवघरात ठेवला जातो.

श्रीयाळ शेठ हे बहामनी राज्यातील (महाराष्ट्र-कर्नाटक भागात यांचे राज्य होते) एक दानशूर, सेवाभावी वृत्तीचे लिंगायतवाणी. साधारण इ.स. १३९६ ला मोठा दुष्काळ पडला… १२ वर्षांचा मोठा दुष्काळ. राजसत्ताही हतबल झाली. त्यावेळी श्रीयाळ शेठ यांनी आपले धान्याचे कोठार गोरगरिबांसाठी खुले केले. बैलगाड्या पाठवून प्रजेला धान्य पुरवले. हे सर्व त्यांनी नि:स्वार्थी भावनेने केले, पण राजाला त्याला इनाम द्यायचे होते. तेव्हा श्रीयाळशेठांनी ‘औट घटकेचे (साडे तीन तासांचे) राज्य’ मागितले… विचित्र होते पण राजाने तसे केले. पण विनम्र श्रीयाळशेठांना सिंहासन नको होते, तर त्या सत्तेचा वापर करून कमीत कमी काळात लोकाभिमुख काम, दानधर्म करायचे होते, ते त्यांनी केले…

अशा या औट घटकेच्या श्री श्रीयाळ शेठ राजाची पूजा करायची ती त्यासाठी …

त्याच्यापुढे नतमस्तक होऊन त्याच्याकडून मागायची ती त्याची दिलदारवृत्ती, नि:स्पृह वृत्ती, नि:स्वार्थी सेवाभाव आणि इच्छाशक्ती असेल तर, हातात सत्ता असेल तर ज्या लोकांसाठी आपण सत्तेवर आहोत त्यांच्यासाठी शक्य तेवढे कार्य करत राहण्याची वृत्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *